देशात करोनाचा प्रादुर्भाव आणि त्याचे नवनवे प्रकार वेगाने पसरत असताना केंद्र सरकारने व्यापक लसीकरणावर भर देण्याचं धोरण स्वीकारलं आहे. दुसरीकडे मात्र करोनाच्या लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. याच मुद्द्याला धरून बिहारमध्ये राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. बिहारमधील विरोधी पक्षाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांच पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर सत्ताधारी भाजपाने खोचक शब्दांत टीका केली आहे. तेजस्वी यादव यांनी अजूनपर्यंत करोनाची लस घेतली नसून त्यावरूनच भाजपाकडून तेजस्वी यादव यांना लक्ष्य केलं जात आहे. यासंदर्भात बिहारमधील भाजपाचे प्रवक्ते राम सागर सिंह यांनी तेजस्वी यादव यांना लसीकरणाविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा आधार घेत टोला लगावला आहे.

“लवकरात लवकर लस घ्या”

राम सागर सिंह यांनी लस न घेणाऱ्या तेजस्वी यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर करोनाची लस घेण्याचा सल्ला दिला आहे. “तेजस्वी यादव यांचा त्या अफवेवर विश्वास तर नाही ना ज्यात म्हटलं जातं की करोनाची लस घेतल्यामुळे लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो? जगभरातल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं आहे की करोनाची लस घेतल्यामुळे लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर लस घेतली पाहिजे. करोनाची तिसरी लाट थोपवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. नेतेमंडळींनी लसीकरणावरून राजकारण करू नये”, असं राम सागर सिंह म्हणाले आहेत.

राजदचं भाजपाला प्रत्युत्तर

भाजपाच्या या खोचक टीकेनंतर त्याला राजदकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राजदचे प्रवक्ते मृत्यूंजय तिवारी यांनी भाजपाच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. “भाजपा अशा प्रकारच्या निरर्थक गोष्टींवर चर्चा करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाला आधी हे सांगायला हवं की आत्तापर्यंत किती लोकांना लस देण्यात आली आहे? राज्य सरकारचा दावा आहे की ६ महिन्यांत ६ कोटी लोकांना लस दिली जाईल. पण लसच उपलब्ध नाहीये. याच वेगाने बिहारमध्ये लसीकरण होत राहिलं, तर पुढचं वर्षभर देखील बिहारचं लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण होणार नाही”, असं मृत्यूंजय तिवारी म्हणाले आहेत.

लस घ्यायला गेलेल्या पत्नीचे आधार कार्ड घेऊन झाडावर जाऊन बसला पती; कारण…

काय घेत नाहीत तेजस्वी यादव लस?

दरम्यान, मृत्यूंजय तिवारी यांनी यावेळी तेजस्वी यादव यांनी लस न घेण्याचं कारण देखील सांगितलं. “तेजस्वी यादव यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की सामान्य लोकांना लसीकरण करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा सामान्य लोकांना लसीकरण पूर्ण होईल, तेव्हा ते लस घेतील”, असं ते म्हणाले.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन – वाचा सविस्तर

लसीकरणाबाबत अशा अनेक अफवा पसरवल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ मधून जनतेला अफवांवर विश्वास न ठेवता मोठ्या प्रमाणावर लसीकरणामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. “२१ जून रोजी सर्वाधिक लसीकरण झाले असून आता प्रौढांनाही मोफत लस दिली जात आहे. लस न घेण्याची प्रवृत्ती लोकांनी टाळली पाहिजे”, असे आवाहन करून ते म्हणाले, की “अजून करोनाचा धोका कायम आहे. लशीबाबत कुठल्याही शंका बाळगण्याचे कारण नाही”.