पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. दुसरीकडे तृणमू काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला असल्यानेही राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षांतर करणाऱ्यांना सुनावलं असून ज्यांची भाजपात जाण्याची इच्छा आहे ते जाऊ शकतात अशा शब्दात ठणकावलं आहे. पुरुलिया येथील रॅलीत त्या बोलत होत्या.

“ज्यांना भाजपात जायचं आहे ते जाऊ शकतात, पण आम्ही त्यांच्यासमोर आपली मान झुकवणार नाही. राजकारण ही एक आदर्श विचारसरणी आहे, तत्वज्ञान आहे. आपण रोज कपडे बदलू शकतो, विचारसरणी नाही,” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं. ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपा माओवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक असल्याची टीकाही केली.

“तुम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला मतदान केलंत. पण तुमचे खासदार भेटण्यासाठी आले का? त्यांनी तुम्हाला काही दिलं का? ते निवडणुकीच्या आधी तुम्हाला खोटी आश्वासनं देतील आणि निवडणूक संपली की पळून जातील,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

“पश्चिम बंगालमध्ये भाजपा मैदानात कमी आणि मीडियामध्ये जास्त आहे. विरोधकांना घाबरवण्यासाठी भाजपा आयटीचा वापर करत आहे. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी ते व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करत आहेत. भाजपा माओवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक आहे. त्यांनी बिरसा मुंडा यांचाही अपमान केला. ते बंगाल म्हणतात, पण ते मतांसाठी कंगाल आहेत,” अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केली.