पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री  बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. एवढच नाही तर ते खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत, त्यांनी नुकतीच या निर्णयाची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट टाकून केली आहे. ते पश्चिमबंगाल मधील भाजपाचे एक दिग्गज नेते होते. आता त्यांचा हा निर्णय भाजपासाठी काहीसा धक्कादायक मानला जात आहे.  आसनसोल मतदारसंघातून ते लोकसभेत निवडून गेलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा करताना म्हटले की, ”गुडबाय…. मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाहीये, टीएमसी, काँग्रेस, सीपीआय(एम) कोणीही मला बोलावलेलं नाही, मी कुठेही जाणार नाही. समजाकार्य करण्यासाठी राजकारणातच असण्याच गरज नाही.”

बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा केली आहे. तसेच, खासदरकीचा राजीनामा देऊन, मी माझे शासकीय निवसस्थान महिनाभरात सोडेल, असंही बाबुल सुप्रियो म्हणाले आहेत.

बाबुल सुप्रियोंनी म्हटलं आहे की, ”मी नेहमीच एका संघाचा खेळाडू राहिलेलो आहे. नेहमीच एका संघाला पाठिंबा दिला आहे – मोहनबागाना, एकाच पक्षाच समर्थन केलं आहे – भाजपा. तसेच, त्यांनी हे देखील सांगितले की, खूप अगोदर मी पार्टी सोडू इच्छित होतो. निवडणुकी अगोदर पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर आलेल्या आहेत. तर जबाबदारी घेतोच आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार आहेत.”

मंत्रिपदावरून हटवण्यात आल्यापासून बाबुल सुप्रियो काहीसे शांत होते. शिवाय, ते थोडे अलिप्त देखील राहात होते. त्यामुळे ते राजकीय संन्यास घेऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. अखेर त्यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं.

संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने धुव्वा उडवला आणि बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर भाजपाच्या विरोधकांसह पंतप्रधान मोदींनी व भाजपाच्या काही नेत्यांनीही विजयाबद्दल ममता बॅनर्जींना शुभेच्छा दिल्या. पण, पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी मात्र ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देण्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर क्रूर महिलेला पुन्हा सत्तेवर आणून पश्चिम बंगालच्या मतदारांनी ऐतिहासिक चूक केल्याची टीकाही सुप्रियो यांनी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp and ex union minister babul supriyo quits politics msr
First published on: 31-07-2021 at 17:39 IST