आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर गंभीर पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आला आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर गंभीर सोशल मीडियावर केंद्र सरकारच्या धोरणांचं कौतुक करण्यास नेहमी पुढे असतो. याव्यतिरीक्त दिल्लीतील आप सरकार आणि गंभीर यांच्यातलं द्वंद्वही आपण पाहिलं असेल. पण याव्यतिरीक्त गंभीरने गेल्या काही वर्षांपासून सामाजिक कार्य सुरुच ठेवलं आहे. लॉकडाउन काळातही गंभीरने आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक मजुरांची मदत केली. यानंतर गौतम गंभीरने आणखी एक कौतुकास्पद पाऊल टाकलं आहे.

देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी गौतम गंभीरने घेतली आहे. ‘पंख’ या नावाने गौतम गंभीरने एक सामाजिक उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाअंतर्गत गंभीर २५ मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची व्यवस्था करणार आहे. सेक्स वर्कर्सच्या मुलांना त्या नरकातून बाहेर काढणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं गंभीरने म्हटलंय.

क्रिकेटपटू म्हणून गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय मैदान याआधी गाजवलं आहे. त्यानंतर खासदार म्हणूनही त्याची दुसरी इनिंग तितक्याच जोमाने सुरु आहे. अशा परिस्थितीत सामाजिक कार्याचा वसा हाती घेतलेला गंभीर या क्षेत्रात कसं काम करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.