छत्तीसगडमधील भाजपचे खासदार बन्सीलाल महतो यांनी महिलांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. छत्तीसगढमधील तरुणींबद्दल बोलताना बन्सीलाल महतो यांनी अपशब्दांचा वापर केला. महतो सोमवारी जिल्हा कुस्ती संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी ऊर्जाधानी येथे आले होते. त्यावेळी बोलताना महतो यांनी महिलांबद्दल असभ्य भाषेचा वापर केला.

कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करताना बन्सीलाल महतो यांनी छत्तीसगढचे क्रीडा मंत्री भय्यालाल राजवाडे यांचा उल्लेख केला. आणि त्यानंतर अपशब्दांचा वापर केला. महतो लोकसभेत छत्तीसगढमधील कोरबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून ‘बेटी बचाओ, बेटी बढाओ’चा नारा दिला जात असताना महतोंनी महिलांबद्दल अपमानास्पद विधान केले आहे.

बन्सीलाल महतोंच्या वादग्रस्त विधानाचा काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. महतोंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. ज्या कार्यक्रमात महतोंनी वादग्रस्त विधान केले, त्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र आणि मरवाही मतदारसंघाचे आमदार अमित जोगीदेखील उपस्थित होते. महतोंचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

‘खासदार बन्सीलाल महतोंच्या वादग्रस्त विधानाबद्दल भाजपने राज्यातील जनतेची माफी मागावी,’ अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुशील आनंद शुक्ला यांनी केली. ‘भाजपने लोकांची माफी मागून महतोंकडून खासदारकीचा राजीनामा घ्यावा. महतोंचे विधान महिलांचा अपमान करणारे असून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पाळायच्या किमान शिष्टाचारांच्या मर्यादाही पाळलेल्या नाहीत,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी महतोंवर जोरदार टीका केली. महतोंनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल स्पष्टीकरण देताना आपण महिलांचा सन्मान करत असल्याचे म्हटले आहे. विरोधकांकडून उगाच वातावरण तापवले जात असल्याचेही ते म्हणाले.