दिल्ली सरकार विरुद्ध भाजपा हा वाद काही नविन नाही. दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. करोना काळात तर हा वाद आणखी चिघळला होता. ऑक्सिजन, लसीकरण यावरून वाद टोकाला गेला होता. आता भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी लसीकरणावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे. यमुना खादर या भागात प्रवेश करत लोकांपर्यंत त्यांनी लस पोहोचवली. या भागात फक्त बोटीनेच जाता येतं. लसीकरणावरून भाजपा खासदार गौतम गंभीर याने दिल्ली सरकारवर टीकेची झोड उठवली. फोटो ट्वीट करत गौतम गंभीर यांनी दिल्ली सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

“यमुना खादर भागात फक्त बोटीनेच जाता येतं. इथे मुख्यमंत्र्यांच्या जाहीरातीही पोहोचल्या नाहीत. मात्र आमच्या लसी पोहोचल्या आहेत”, असं ट्वीट गौतम गंभीर याने केलं आहे. तसेच #ShockingNeglectअसा हॅशटॅग टाकला आहे. गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत यमुना खादर भागातील जनतेचं लसीकरण करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासोबत काही भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत आप सरकारनं शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावत ‘लस घेतली का?’, असा प्रश्न विचारला होता. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटो आहे. दिल्लीतील भाजपाला ही बाब रुचली नव्हती दिल्लीतील केजरीवाल सरकार काहीच करत नसताना लसीकरणाचं श्रेय घेत असल्याचा आरोप भाजपाने केला होता. या विरोधात दिल्ली भाजपाचे उपाध्यक्ष राजीव बब्बर यांनी बॅनरबाजी करत उत्तर दिलं होतं. यात फक्त एक ओळ त्यांनी वाढवली आहे. “लस घेतली का? जी दिल्लीला पंतप्रधान मोदी यांनी मोफत दिली आहे”, असं त्या बॅनरमध्ये लिहिण्यात आलं होतं. हे बॅनर जिथे जिथे अरविंद केजरीवाल यांचे बॅनर लागले होते, तिथे तिथे लावण्यात आले होते.

दुसरीकडे गौतम गंभीरच्या फाउंडेशनविरोधात करोना औषधं वाटण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आम आदमी पक्षाच्या आमदाराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अवैधरित्या औषधांचा साठा आणि वितरण केल्याप्रकरणी दिल्ली औषध नियंत्रण विभागाने याबाबत तपास सुरु केला आहे. यात गौतम गंभीर फाउंडेशन आणि आम आदमी पक्षाच्या इमरान हुसैन आणि प्रवीण कुमार यांची नावे आहेत.