परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे आज लोकसभेतही पडसाद उमटले. काही भाजपा खासदारांनी परमबीर सिंग यांनी दिलेल्या पत्राचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या मागणीला विरोध करत पंजाबमधील लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह यांनी भाजपावर टीकास्त्र डागलं. भाजपाला मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र तोडायचा आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा सिंह यांनी दिला.

परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उपस्थित करत पुण्याचे भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. बापट यांच्याबरोबरच खासदार पुनम महाजन आणि नवनीत राणा यांनीही राज्य सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते. आता सरकार खंडणी मागायला लागलं आहे. गृहमंत्री खंडणी मागायला लागले आहेत. म्हणजे कुंपन शेत खायला लागली आहे आणि पाण्याला तहान लागली आहे. सरकार भ्रष्ट होत चाललं आहे. त्यामुळे ताबडतोब महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना आतमध्ये टाका, ही आमची मागणी आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेलं आहे. पोलीस खंडणी मागायला लागले आहेत. त्या पोलिसांना मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत,” असं गिरीश बापट म्हणाले.

यावर पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह म्हणाले,”हा फार गंभीर मुद्दा आहे. ही फक्त महाराष्ट्रापुरती गोष्ट नाहीये. ही संपूर्ण देशातील गोष्ट असून, चिंतेची बाब आहे. पण हे कोठून होतंय. ज्या ठिकाणी विरोधी पक्षांची सरकारं आहेत, तिथे संघराज्याची चौकट का तोडली जाते. तिथेच केंद्रीय संस्था का हस्तक्षेप करतात. आपण एकमेकांवर आरोप करून जे मूळ आरोपी असतात, जे गुन्हेगार अधिकारी असतात, ते यात वाचतात. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करतात आणि गुन्हे करणारे अधिकारी बाजूला राहतात. आपण बोलत राहू पण अधिकारी सुटता कामा नये. हा तोच अधिकारी जो यांना (भाजपा) चांगला वाटतो. अधिकारी दोन्ही बाजूने काम करतात. पण, महाराष्ट्रात इथून असे अधिकारी पाठवले जातील, तर सहन केलं जाणार नाही. महाराष्ट्र खूप चांगलं राज्य आहे. पण, तुम्हाला (भाजपाला) महाराष्ट्रही मध्य प्रदेशसारखा तोडायचा आहे. तिथलं सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. हे खपवून घेतलं जाणार नाही. बाहेरच्या तपास यंत्रणांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही,” असा इशारा पंजाबमधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह यांनी दिला.