भाजपाच्या मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूच आहे. आता वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये खासदार लक्ष्मीनारायण यादव यांच्या नावाचा समावेश झाला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात यादव यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पाणी प्रश्नावरून यादव यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते अचानक चिडले आणि पाण्याची समस्या तर माझा बापही सोडवू शकत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले. वाचाळ नेत्यांमुळे भाजपासमोरील अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसते.

मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड परिसरात अनेक दशकांपासून पाण्याची गंभीर समस्या आहे. विशेषत: उन्हाळ्यात येथील लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. बुंदेलखंडमधील दुर्गम परिसरात राहणाऱ्या लोकांना आजही पाण्यासाठी कोसो दूर जावे लागते. अनेकवेळा याबाबत माध्यमांमध्ये आले आहे. त्यामुळे खासदार यादव यांना बुंदेलखंडमधील जलसंकटाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या समस्येसाठी काय घरोघरी पाण्याचे ग्लास घेऊन जाऊ का, असा उलट सवाल केला. माझ्या मतदारसंघात ८२५ पंचायत आहेत. अशात माझे वडीलही ही समस्या सोडवू शकत नाहीत, असे ते तावातावाने म्हणाले.

यादव हे सागर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर गेले आहेत. ते पुढे म्हणाले, नल-जल योजनेचे काम सुरू आहे. जनता ४-५ महिने वाट पाहू शकत नाही का, असा सवाल उपस्थित केला. यादव हे सागर जिल्ह्यातील जासी नगर येथे उज्वला योजनेतंर्गत गॅस सिलिंडरच्या वितरण कार्यक्रमासाठी आले होते. याच कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी आपल्या खासदार आणि आमदारांशी संवाद साधताना वादग्रस्त वक्तव्यापासून दूर राहा असा सल्ला दिला होता.