योग्य वेळी योग्य पर्याय निवडण्याचे मनसुबे

थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य करणारे भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले हे काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विदर्भात सक्रिय असलेल्या ‘प्रहार’ संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. मात्र पटोले यांनी अद्याप ‘अंतिम निर्णय’ न घेता ‘योग्य वेळी योग्य पर्याय’ निवडण्याचे ठरविले असल्याचेही समजते.

‘शक्तिशाली’ मोदींना थेट अंगावर घेण्याची हिंमत दाखविल्यापासून पटोले हे भाजपविरोधकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. काँग्रेसबरोबरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून नुकतेच बाहेर पडलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू हे त्यांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर विरोधी पक्षातील अनेक बडय़ा नेत्यांनी त्यांच्या ‘धाडसा’चे कौतुक केले. याउलट प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याव्यतिरिक्त भाजपमधून कुणीही त्यांच्याशी संपर्क साधला नसल्याचे सांगण्यात आले.

केंद्रीय मंत्रिमंडळात न मिळालेली संधी, शेतकऱ्यांबाबत सरकारचे नकारात्मक धोरण, कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असणारे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना भाजपकडूनच मिळत असलेले संरक्षण आणि खासदारांच्या बैठकीत मोदींनी केलेली कानउघाडणी जिव्हारी लागल्याने पटोले सात महिन्यांपासून नाराज आहेत. आपल्या मनातील खदखद उघड करताना त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कर्जमाफीवरून लक्ष्य केले आणि नंतर तर थेट मोदींवरच तोफ डागली. खासदारांनी विचारलेले प्रश्न मोदींना आवडत नाहीत, मंत्री त्यांना घाबरून असतात, अशा मोदींच्या मंत्रिमंडळात कामच करायचे नाही अशा प्रकारची आक्रमक विधाने त्यांनी नुकतीच केली आहेत. तेव्हापासून पटोले हे ‘बंडखोरीच्या उंबरठय़ा’वर असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसचे तीनदा आमदार असलेले पटोले २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आले आणि प्रफुल्ल पटेलांसारख्या ताकदवान नेत्याचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता. ते लोकसभेऐवजी विधानसभा लढविण्यास पसंती देण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबरील उद्याच्या भेटीकडे लक्ष

नाराज नाना पटोले यांची उद्या (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट होणार असल्याचे समजते. बैठकीचा अधिकृत विषय गोवारी समाजासंदर्भात असला तरी त्यानिमित्ताने पटोलेंची समजूत घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न असेल.