बिहारमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर भाजपा राज्यामधील जनता दल संयुक्त (जदयू) पक्षावर दबाव वाढवेल अशी शक्यता राजकीय वर्तुळामधून व्यक्त केली जात होती. निकालानंतर काही दिवसांमध्येच याचा पहिला प्रत्यय आला आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाजपाने हळूहळू दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर असावेत अशी भाजपाची इच्छा असली तरी सत्तेची सूत्र मात्र आपल्या हातात ठेवण्यात भाजपाला रस आहे. नितीश कुमार यांनी आपल्या आधीच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये दारुबंदीची घोषणा केली आणि ती अंमलात आणली होती. त्यामुळे नितीश पुन्हा सत्तेत आल्यावर हा निर्णय कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र भाजपा खासदारांनी निकालानंतर सत्ता स्थापनेच्या आधीच राज्यातील दारुबंदी मागे घेण्यासंदर्भातील मागण्या सुरु केल्या आहेत.

झारखंडमधील गोड्डा मतदारसंघातून भाजपाचे खासदर असणाऱ्या निशिकांत दुबे यांनी बिहारमधील नितीश कुमार सरकारला दारुबंदीच्या कायद्यासंदर्भात संशोधन करुन त्यामध्ये बदल करण्यासंदर्भात विचार करण्याची मागणी केली आहे. निशिकांत दुबे यांनी ट्विटवरुन, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजींकडे आग्रहाची विनंती आहे की दारुबंदी कायद्यासंदर्भात काही संशोधन करावं. कारण ज्यांना प्यायची आहे किंवा पाजायची आहे ते नेपाळ, बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा मार्ग वापरतात. यामुळे महसूल बुडतो, हॉटेल उद्योगलाही त्याचा फटका बसतो. तसेच पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराला खतपाणी घातलं जातं,” असं म्हटलं आहे.


बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दारुबंदी हा महत्वाच्या विषयांपैकी एक होता. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दारुबंदीमुळे राज्यातील बेरोजगार तरुण दारु तस्करी करु लागले असल्याचं म्हटलं होतं. राज्यात दारुबंदी लागू झाल्यानंतर काय परिस्थिती आहे याचा अंदाज राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्र्यांना नक्कीच आहे, असंही चिराग म्हणाले होते.

आणखी वाचा- ‘अखेरची निवडणूक’ या वक्तव्यावर नितीश कुमारांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

चिराग यांच्या या टीकेला उत्तर देताना नितीश यांनी चिराग यांना लहान मुलं असं म्हटलं होतं. दारुबंदीमुळे काहीजण माझ्यावर चिडले आहेत, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे एखाद्या लहान मुलाला प्रसिद्धी मिळत असली तर त्यात गैर काय आहे, असा टोला नितीश यांनी लगावला होता.