ज्यांचे पैसे ‘वेल’मध्ये (विहरीत/पाण्यात) गेले आहेत, तेच लोक सध्या संसदेच्या ‘वेल’मध्ये गोंधळ घालत आहेत, अशी उपरोधिक टीका भाजप खासदार परेश रावल यांनी केली आहे. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी परेश रावल यांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर उपहासात्मक टीका केली. मोदी सरकारने देशातील काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयामुळे रोख रकमेच्या स्वरूपात काळे धन बाळगणाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. हा काळा पैसा बँकेत जमा करायचा तर सरकारकडून कारवाई होण्याची भीती आणि नाही केला तर पैसा वाया जाण्याची भीती, असे दुहेरी संकट या काळा पैसा धारकांपुढे उभे राहिले आहे. हिवाळी अधिवेशन सुरू झाल्या दिवसापासून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात येऊन नोटाबंदीच्या निर्णयावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत आहेत. ही मागणी लावून धरण्यासाठी विरोधक वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसत आहेत. यापैकी काही खासदारांकडून सभागृहातील अध्यक्षांच्या आसनासमोरच्या जागेत (वेल) येऊन गोंधळ घातला जात आहे. परेश रावल यांनी नेमका हाच धागा पकडत नोटांबदीच्या मुद्द्यावरून संसदेचे कामकाज रोखून धरणाऱ्या विरोधकांना लक्ष्य केले. ज्यांचे पैसे ‘वेल’मध्ये आहेत, तेच संसदेच्या ‘वेल’मध्ये येत आहेत. यावरून तुम्ही काय ते समजून घ्या, असे रावल यांनी म्हटले.

यापूर्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीदेखील संसदेचे कामकाज रोखून धरण्यावरून विरोधकांवर ताशेरे ओढले होते. विरोधक केवळ टेलिव्हिजनवर झळकण्यासाठीच सभागृहात गोंधळ घालतात, असे विधान महाजन यांनी केले होते. मी तुमच्यासाठी लोकसभा वाहिनीला सांगून तशी व्यवस्था करेन. त्यामुळे संपूर्ण देशाला तुम्ही सभागृहात कशाप्रकारे गोंधळ घालत आहात ते दिसेल, असे सुमित्रा महाजन यांनी म्हटले. तुम्ही कितीही आदळआपट केली तरी तुमचा स्थगन प्रस्ताव स्विकारला जाणार नाही, असेही महाजन यांनी विरोधकांनी ठणकावून सांगितले होते.