देशातच नव्हे तर जगभरात सध्या करोनामुळे चिंताग्रस्त वातावरण आहे. करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, अनेक राज्यांमध्ये प्रसार वेगानं होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसभरात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येतही प्रचंड मोठी वाढ झाली आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष सध्या करोना लसीकडे लागलं आहे. अशात भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला आहे.

करोनामुळे काहीसं भीतीचं वातावरण आहे. प्रसार रोखण्याबरोबरच सरकारकडून उपाययोजनाही केल्या जात आहेत. अशात भाजपाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विट करून करोना बरा होण्याचा उपाय सूचवला आहे.

“चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचं पठण करावं. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा”, असं प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यापूर्वीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही असाच उपाय सूचवला होता. “भारतीय परंपरा सखोलपणे समजून घेण्याची गरज आहे. योगामध्ये अनेक गोष्टी आहेत. जग मानसिक आणि शारीरिक आजाराविरोधात लढा देत आहे. पण, योगाच्या साहाय्याने आपण रक्तदाब, ह्रदयविकार, मूत्रपिंड यकृत आणि अगदी करोना व्हायरससारख्या आजारांवरही उपचार केले जाऊ शकतात,” असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ म्हणाले होते.