भारतीय जनता पार्टीच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. साध्वी प्रज्ञा यांनी घरातच लस टोचून घेतल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणत्याही लसीकरण केंद्रावर न जाता, अथवा रुग्णालयात न जाता त्यांनी घरातच लस घेतल्यामुळे काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासदार साध्वी प्रज्ञा यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना करोना प्रतिबंधक लस टोचली. यावरुन मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी साध्वी प्रज्ञा यांच्यावर टीका केली आहे.


आपल्या ट्विटमध्ये त्यांनी प्रज्ञा यांचा लस घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, काही दिवसांपूर्वीच प्रज्ञा ठाकूर बास्केटबॉल खेळत होत्या, ढोल वाजवत नाचत होत्या. आज त्यांनी घरीच आरोग्य अधिकारी बोलावून करोनाची लस टोचून घेतली. नरेंद्र मोदींपासून सगळे भाजपा नेते रुग्णालयात जाऊन लस घेऊन आले. पण मग या खासदारांनाच ही विशेष सूट का? कोणत्या आधारावर?

याआधीही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हाही काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली होती. आजपर्यंत अनेकदा त्यांना व्हिलचेअरवरच पाहिलं गेलं आहे. त्यांना कोणाच्याही आधाराशिवाय जिना चढता उतरता येत नाही, मग त्या बास्केटबॉल कशा काय खेळल्या असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता.