ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आलं त्याचप्रमाणे अयोध्येत राम मंदिर उभारु असं वक्तव्य भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांनी केलं आहे. जोपर्यंत राम मंदिर उभारलं जात नाही तपोर्यंत आपल्याला काहीच होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. भोपाळ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, “राम मंदिर अयोध्येत उभारलं जाणार आहे. अगदी त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आलं. अयोध्येत राम मंदिराचं बांधकाम सुरु असेल तोपर्यंत मला काहीच होणार नाही”. पुढे त्यांनी सांगितलं की, “आज प्रत्येकालाच ३७० कलम हटवल्याने देश एकत्रित झाल्याचा विश्वास वाटत आहे. आता लवकरच भव्य राम मंदिर उभारलं जाईल आणि आपण त्याचे साक्षीदार असू”.

याआधी उत्तर प्रदेशचे मंत्री सुनील भराला यांनीदेखील अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातच राम मंदिर उभारलं जाईल. ते निर्णय घेणारे व्यक्ती आहेत. त्यांच्यात अपार शक्ती असून राम मंदिर उभारणाऱ्यांमध्ये त्यांचाही सहभाग असेल”.