बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या एका प्रश्नाला वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी थेट मराठीत उत्तर देत लोकसभेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्हा व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त कापूस ऊत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी अशी मागणी आज संसदेत केली. यावर उत्तर देताना स्मृती इराणी यांनी मराठीत उत्तर देत मी महाराष्ट्राचीच असल्याचं सांगितलं.

‘मी महाराष्ट्राचीच असून मलादेखील शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत’, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. यावेळी स्मृती इराणी यांनी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासनही प्रीतम मुंडे यांना दिलं. महिला आणि बालकल्याण विभागासह वस्त्रोद्योग खातंही स्मृती इराणी यांच्याकडेच आहे.

यावेळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रीतम मुंडे यांनी इंग्रजीत स्मृती इराणी यांना प्रश्न विचारला होता. प्रीतम मुंडे यांनी वस्त्रोद्योग विभागाने कापूस उत्पादक जिल्ह्यांकडे लक्ष द्यावं. ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, अशी मागणी केली होती.

उत्तर देताना स्मृती इराणी यांनी मराठीत सुरुवात केली. मी महाराष्ट्राचीच असून मलादेखील शेतकऱ्यांच्या समस्या माहिती आहेत असं बोलताना शक्य ती मदत मराठवाड्याला केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.