गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीमेवर भारतीय जवानाची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या कृत्याचा बदला घेणे गरजेचे आहे, असे म्हटल्यानंतर आता भाजपाचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक राकेश सिन्हा यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. ‘पाकिस्तानातून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया थांबल्या नाहीत तर मोदी सरकार पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करेल, त्यानंतर इस्लामाबाद भारतात आलेलं असेल. जगाच्या पाठीवर पाकिस्तानचे निशाणही राहणार नाही’, असं सिन्हा म्हणाले.

बिहारच्या बेगूसराय येथे एका कार्यक्रमामध्ये राकेश सिन्हा बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्रनितीचं कौतुक करताना सिन्हा म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांसोबत डोळयात डोळे घालून बोलतात. जर भारताने भगवान शंकराप्रमाणे तिसरा डोळा उघडला तर पाकिस्तानचा सर्वनाश होईल. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, पण आता त्याचं नामोनिशाणही राहणार नाही आणि जगभरात लोक पाकिस्तानचं नाव शोधत बसतील’, अशा शब्दात सिन्हा यांनी पाकिस्तानला धमकीवजा इशारा दिला आहे.

पाकिस्तान अधिकृत काश्मीर मिळवण्यासाठी मोदी सरकारने संकल्प केला आहे, याचा पुनरुच्चारही सिन्हा यांनी यावेळी केला. काही दिवसांपूर्वीच राकेश सिन्हा हे राज्यसभेत भाजपाकडून खासदार बनले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक म्हणून त्यांची ओळख असून अनेक वृत्तवाहिन्यांवर ते सरकार आणि संघाची बाजू मांडताना दिसतात.