उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांच्या जामा मशिद उद्ध्वस्त करण्याच्या विधानानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. फोनद्वारे त्यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. साक्षी महाराजांनी याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांना माहिती दिली असून झेड प्लस सुरक्षेची मागणी केली आहे.

दोन वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन आला आणि बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली . सोमवारी दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी आणि संध्याकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने स्वतःचं नाव मोहम्मद अंसारी सांगितलं आणि महाराष्ट्रातील अकोल्याचा रहिवासी असल्याचं सांगितलं, असं साक्षी महाराज यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. यापूर्वी 23 आणि 24 नोव्हेंबर रोजीही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यावेळी डी कंपनीचा हस्तक असल्याचं धमकी देणाऱ्याने सांगितलं होतं असंही साक्षी महाराजांनी पत्रात म्हटलं आहे.

जेव्हा मी राजकारणात आलो होतो तेव्हा माझी पहिली घोषणा होती की, अयोध्या-मथुरा-काशी सोडा, दिल्लीची जामा मशिद तोडा. ही मशीद तोडल्यानंतर इथं हिंदू देवतांच्या मुर्त्या सापडल्या नाहीत तर मला फाशीवर लटकवा. असं वादग्रस्त विधान साक्षी महाराज यांनी गुरुवारी (दि. २२) झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात केलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तेव्हापासून त्यांना धमक्या येत आहेत.