अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्ट राम मंदिराच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास व्यक्त करत २०१९ पूर्वीच राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल, असा दावा भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी केला. जिथे जिथे हिंदू कमी झाले तिथेच दंगली होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपा खासदार साक्षी महाराज शनिवारी जबलपूरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी राम मंदिर, पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत भाष्य केले. अयोध्येतील राम मंदिराबाबत ते म्हणालेत, अयोध्येतील राम मंदिराचे काम लवकरच सुरु होणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनेच येईल. २०१९ पूर्वीच मंदिराच्या कामाला सुरुवात होईल आणि कोणीही राम मंदिराच्या कामाला रोखू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील परिस्थिती चिंताजनक असून जिथे जिथे हिंदू कमी झाले तिथेच दंगली होत आहेत. हिंदू एकत्र आले नाही तर देशाची फाळणी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु असतानाच याची त्यांनी खिल्ली उडवली. देशात मोदींना हटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोदींसारखी लोकं इतिहास घडवण्यासाठी जन्माला येतात. विरोधकांची महाआघाडी झाली तरी त्यांच्यात नवरा मुलगा कोण असेल, असा प्रश्न विचारत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. काँग्रेस प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत असल्याची टीका त्यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 1, 2018 2:39 pm