भाजपा खासदार साक्षी महाराज हे करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. साक्षी महाराज हे उत्तर प्रदेशातील उन्नावचे खासदार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना करोनाची काही लक्षणं जाणवू लागली ज्यानंतर त्यांनी करोनाची चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी असंही साक्षी महाराजांनी म्हटलं आहे.

खासदार साक्षी महाराज यांनी लोकांना आवाहन केलं आहे की जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी त्यांची करोना चाचणी करुन घ्यावी. करोनाची बाधा झाल्याने ते होम क्वारंटाइन असणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली आहे. एबीपी न्यूजने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

देशात करोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नसला, तरी दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ९२० जणांनी करोनावर मात केली आहे. तर,  ५० हजार ३५७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून, ५७७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ८४ लाख ६२ हजार ८१ वर पोहचली आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशात २३ हजार १३२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आत्तापर्यंत ४ लाख ६३ हजार २४० जण करोनामुक्तही झाले आहेत. तर करोनामुळे उत्तर प्रदेशात ७ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.