काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची बुधवारी आपल्या एका ट्विटमध्ये चुकीची माहिती दिल्यामुळे फसगत झाली. सोशल मीडियावर लोकांनी प्रियंका गांधींच्या ट्विटवरुन त्यांना जबरदस्त ट्रोल केलं. भाजपा नेता आणि लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी तर प्रियंका गांधी यांना निवडणूक नियम माहित नसतील गप्प बसावं, असा सल्ला दिला.

झालं असं की, प्रियंका गांधी यांनी “केरळमध्ये आमचे 50 टक्के उमेदवार 20 ते 40 वयोगटातले असल्याचा खूप अभिमान वाटतोय. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा अनुभव आणि ज्ञानामुळे ते संयुक्तपणे एक शक्तीशाली ताकद बनतात. मला आशा आहे की, केरळच्या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळेल, जेणेकरुन युडीएफचा दृष्टीकोन समजेल” असं ट्विट केलं होतं.


पण, या ट्विटमध्ये प्रियंका गांधींनी उमेदवारांचं किमान वय 20 वर्ष लिहिलं, त्यावरुन सोशल मीडियावर त्यांच्या राजकीय समज आणि ज्ञानाबद्दल प्रश्न विचारण्यास सुरूवात झाली. अशातच जमयांग सेरिंग नामग्याल यांनी प्रियंका गांधींना उत्तर दिलं. “जर तुम्हाला सक्रिय राजकारण आणि निवडणूक नियम माहित नसतील तर शांत बसणं एक चांगला पर्याय आहे”, असा टोला त्यांनी प्रियंका गांधी यांना लगावला. “भारतात निवडणूक लढण्याची किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे, आता तुमच्या 20 ते 25 वयोगटातील उमेदवारांचं काय होणार?” असंही खासदार नामग्याल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.


भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक लढण्याचे किमान वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे, तर प्रियंका यांनी आपल्या ट्विटमध्ये 20 वर्षे नमूद केलं होतं. सोशल मीडियावर त्यांच्या या ट्विटची नेटकऱ्यांनी चांगलीच मजा घेतली.