उत्तर प्रदेशमध्ये जिल्हा नियोजन बैठकीत मंत्र्यांसमोरच धक्कादायक प्रकार

संत कबीर नगर (उत्तर प्रदेश)

शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपच्या उत्तर प्रदेशातील खासदार-आमदारांत बुधवारी हाणामारीचा प्रसंग घडला. विशेष म्हणजे पालकमंत्री आशुतोष टंडन व ज्येष्ठ अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडला. या घटनेने भाजपमधील बेदिली चव्हाटय़ावर आली. अखेर बुधवारी उशिरा पक्षाने याची दखल घेत शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजधानी लखनौपासून २०० किमी अंतरावर संत कबीर नगर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी ही हाणामारी झाली. खासदार शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश बघेल यांना एका रस्त्याच्या पायाभरणी समारंभातील कार्यक्रमाच्या कोनशीलेवर नाव नसल्याबद्दल जाब विचारला. त्यावर हा आपला निर्णय होता असे बघेल यांनी सांगताच हा वाद आणखी वाढला. त्रिपाठी यांनी बघेल यांना बुटानेच मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला बघेल यांनी तसेच उत्तर दिले. या हाणामारीने उपस्थित मात्र अवाक झाले. अखेर बैठकीला उपस्थित असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. या दरम्यान टंडन बैठक सोडून गेले. या घटनेने भाजपच्या नेत्यांना काय प्रतिक्रिया द्यावे हे समजेनासे झाले. जिल्हाध्यक्ष सेठबहन राय यांनी मंत्र्यांनी या मारहाणीबाबत सांगितले असे उत्तर दिले. मात्र बैठकीवेळी मी बाहेर होतो. प्रदेशाध्यक्षांनी या घटनेबाबत अहवाल देण्यास सांगितल्याचे मान्य केले. विकासकामांची चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. त्यातच असा प्रकार घडणे निषेधार्ह आहे असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या मारहाणीची चित्रफीत विविध वृत्तवाहिन्यांवर येताच भाजपला जाग आली. त्यात त्रिपाठी आक्रमक होते त्यांनी आमदारांना कोनशीलेवर नाव नसल्याबद्दल जाब विचारल्याचे दिसत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी या घटनेची गंभीर दखर घेत संबंधित आमदार व खासदाराला पाचारण केले आहे. शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे पांडे यांनी स्पष्ट केले.

आमदार युवा वाहिनीशी संबंधित

४७ वर्षीय त्रिपाठी हे संत कबीर नगरचे लोकसभा सदस्य आहेत. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या युवा वाहिनीशी संबंधित असलेले बघेल हे मेढवालचे आमदार आहेत.

हा प्रकार अशोभनीय आहे. याची गंभीर दखल पक्षाने घेतली असून कारवाई केली जाईल.

– महेंद्रनाथ पांडे, भाजप प्रदेशाध्यक्ष