भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मोदींच्या मंत्रिमंडळातील ९०% मंत्र्यांना कोणीही ओळखत नाही आणि उरलेल्या १०% मंत्र्यांचा कोणीही आदर करत नाही,’ अशा शब्दांमध्ये सिन्हा यांनी मोदींच्या कॅबिनेटवर हल्लाबोल केला. याआधी बुधवारी सिन्हा यांनी ‘पद्मावती चित्रपटावरुन देशभरात वाद सुरु होत असताना मोदी गप्प का?,’ असा सवाल उपस्थित केला होता.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींच्या मंत्रिमंडळावर तोफ डागली. ‘मोदींच्या मंत्रिमंडळातील ९०% लोकांना देशातील जनता ओळखत नाही आणि उरलेल्या १०% लोकांबद्दल जनतेला आदर वाटत नाही,’ असे सिन्हा म्हणाले. ‘मोदींचे मंत्रिमंडळ आणि त्यांच्या कामाबद्दल जनतेला कोणतीही माहिती नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातील ९०% चेहरे जनतेसाठी अनोळखी आहेत. तर उर्वरित १०% मंत्र्यांनी जनतेच्या मनात असलेला आदर गमावलेला आहे,’ असे त्यांनी म्हटले. ‘मोदींच्या मंत्रिमंडळातील एकाही सदस्याच्या मनात काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा नाही. प्रत्येक मंत्री केवळ स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न करत आहे,’ अशा शब्दांमध्ये शॉटगन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदींच्या मंत्रिमंडळावर शरसंधान साधले.

सरकारवर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, अशी विधाने भाजप नेत्यांकडून अनेकदा करण्यात आली आहेत. त्यावरुनही सिन्हा यांनी मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘सध्याची परिस्थिती पाहता, तुम्ही एखाद्या व्यक्तीचे समर्थन करु शकता. अन्यथा तुम्हाला थेट देशद्रोही ठरवले जाते,’ असे सिन्हा यांनी म्हटले. मोदी सरकारला कायम लक्ष्य करणारे सिन्हा आज एका कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांच्यासोबत उपस्थित होते. संयुक्त जनता दलाचे नेते अली अन्वर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हे सर्व नेते एकत्र आले होते.

या कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी मोदींच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा,’ या घोषणेची खिल्ली उडवली. ‘सध्या देशातील परिस्थिती ना जिऊंगा, ना जीने दूंगा, अशी झाली आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या वृत्ताचे सिन्हा यांनी खंडन केले. मला कधीही मंत्रिपदाची आशा नव्हती, असे ते म्हणाले.