राफेल लढाऊ विमानावरुन देशात सध्या एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेस-भाजपा हे राजकीय पक्ष या मुद्यावरून एकमेकांवर तुटून पडले आहेत. दरम्यान, भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला घरचा अहेर दिला आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच हल्लाबोल केला आहे. राफेल वादामुळे पंतप्रधान मोदींच्या विश्वासाहर्तेला तडा गेल्याची टीका त्यांनी केली आहे.

राफेल प्रकरणामुळे केंद्र सरकारच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यामुळे मागील ४ वर्षांपासून भ्रष्टाचार मुक्त राहिलेल्या मोदी सरकारला नजर लागल्यासारखे वाटत असल्याचेही शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून राफेल प्रकरणावरुन ज्या पद्धतीने वाद सुरु आहे. त्यावरुन असे वाटते की हे प्रकरण आता मोदी सरकारला कायमस्वरुपी चिकटले आहे. या प्रकरणावरुन पंतप्रधानांवर जे आरोप केले जात आहे. त्याचे उत्तर पारदर्शीपणे देणे आवश्यक आहे. परंतु, असे होताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मोदी सरकार विरोधी पक्ष आणि जनतेचे या महत्वपूर्ण मुद्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत जी प्रश्ने उपस्थित केलीत त्याची उत्तरे देण्याचे टाळून दुसरेच मुद्दे समोर आणली जात आहेत. राफेल घोटाळा हा बोफोर्स घोटाळ्याचा ‘ग्रँड फादर’ बनला आहे. मोदींनी मौन सोडावे. यासाठी जेपीसीची नियुक्ती केली जावी. म्हणजे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जाईल, असेही ते म्हणाले. राफेल व्यवहार का झाला, कसा झाला, कोणत्या परिस्थितीत झाला, कोणासाठी झाला आणि त्याचबरोबर याचे लाभार्थी कोण आहेत आणि का आहेत, या सर्व प्रश्नांची मोदींनी उत्तरे दिली पाहिजेत.