भारत-चीन लष्करामध्ये झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढत सीमेवरील तणाव करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. दरम्यान, भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी चिनी सैन्यानं भारतीय हद्दीत घुसखोरी का केली होती? असा प्रश्न विचारत त्यामागील कारणेही सांगितली आहेत.

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारत-चीन सीमावादासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून सुब्रमण्यम यांनी गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षांमागील कारणांचा तसेत चिनी सैन्यानं सीमारेषा ओलांडण्यामागील कारणांवर भाष्य केलं आहे. “चिनी सैन्याने नियंत्रण रेषा का ओलांडली? लडाखमध्ये सुरु असलेले पायभूत सोयी-सुविधांचे प्रकल्प आणि अनुच्छेद ३७० रद्द केल्यामुळे पीएलए (चिनी लष्कर) नेतृत्वाच्या मनात भीती होती. गमावलेली जमीन परत मिळवण्याच्या आमच्या योजनेची त्यांना जाणीव होती. परंतु चिनी सैन्यानं भारतीयांच्या राष्ट्रवादाला कमी लेखण्याची चूक केली,” असं स्वामी यांनी म्हटलं आहे.

१५ जूनच्या रात्री गलवान व्हॅलीत दोन्ही देशांच्या लष्करामध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. या संघर्षानंतर तब्बल महिनाभर सीमेबरोबरच दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. मात्र, दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं टाकली आहेत. सध्या चीननं गलवान व्हॅलीतून लष्कर मागं घेतलं आहे.