अनेक दशकांपासून राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद सुरू आहे. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या बाजूनेच न्यायालय निकाल देईल, अशी आशा भाजपचे खासदार सब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. अलाहाबादमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. बाबरी मशीद बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी एक मंदिर अस्तित्वात होते, असा अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या दोन तज्ज्ञांच्या पथकाने दिला होता, असा दावाही त्यांनी केला. या अहवालाच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधण्याचा प्रस्ताव संसदेत मांडावा, असे ते म्हणाले. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच याबाबत निर्णय घेता येईल, असेही ते म्हणाले.

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मंदिर होते, असे पुरातत्व खात्याने सर्वेक्षणात म्हटले आहे. याच अहवालाच्या आधारे पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर उभारणीसंदर्भात संसदेत प्रस्ताव आणावा, असे स्वामी म्हणाले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि उमा भारती यांनी अयोध्येतील मशीद पाडली नाही, असा दावाही त्यांनी केला. मुस्लिमांनी ४० हजार हिंदू मंदिरे तोडली होती. पण हिंदू समाज केवळ मथुरा, अयोध्या आणि वाराणसी येथील तीन मंदिरांची मागणी करत आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाने पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले. मुस्लिम आणि हिंदू हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत, असेही ते म्हणाले.