बंगळुरुतील दक्षिण बंगळुरू मतदारसंघाचे भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शहरातील दक्षिण विभागात असणाऱ्या बीबीपीएम येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी गेलेल्या सूर्या आणि भाजपाच्या इतर काही नेत्यांनी या केंद्रामध्ये एका विशिष्ट समाजाचे कर्मचारीच कसे नियुक्त करण्यात आले असा प्रश्न येथील व्यवस्थापनाला विचारल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन तेजस्वी सूर्या यांच्यावर टीका केली जात आहे. करोनाविरुद्धच्या युद्धाला सूर्या जातीयवाद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे. त्यानंतर आता तेजस्वी सूर्या यांनी या प्रकरणाबाबत माफी मागितली आहे.

तेजस्वी सूर्या यांचा दोन दिवसापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयच्या कर्मचाऱ्याकडे माफी मागितली आहे. त्या व्हिडिओमध्ये सूर्या आपल्या मतदारसंघातील चार आमदारांसह कोव्हिड वॉर रुमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी तेथील १६ मुस्लिम कर्मचार्‍यांची नावे वाचून दाखवली होती, त्यावर दुसऱ्या एका आमदाने तुम्ही हेल्पलाईन चालवत आहात की मदरसा? असा सवाल केला होता.

बेडचे वाटप करण्याच्या घोटाळ्यात १६ कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती तपासून पाहिली असता, फक्त एकच बेड या कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात आल्याचे समोर आले. त्यातही तो कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या घरी आपत्कालीन परिस्थिती आल्याने कामावर आला होता अशी माहिती समोर आली आहे. इतर १५ कर्मचारी हे पदवीधारक आणि करोना काळात काम केलेले होते.

या सर्व प्रकरणानंतर तेजस्वी सूर्या यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. “तुमच्यापैकी कोणाविरुद्ध माझे काही वैयक्तिक वैर नाही. माझ्या भेटीमुळे कुणाच्या किंवा कोणत्याही समुदायाच्या भावना दुखावल्या असल्यास त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. बेड वाटपाच्या घोटाळ्याची मला चौकशी करायची होती. माझ्या कृतीतून कोणी दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो,” असे सूर्या यांनी म्हटल्याचे क्रिस्टल इन्फोसिस्टम्स अँड सर्व्हिसेसचे प्रोजेक्ट मॅनेजर शिवू नाईक म्हणाले.

दरम्यान, सूर्या यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बीबीएमपी रुग्णालयात बेड वाटप घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता.