जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीरबाबत वक्तव्यांना सुरूवात झाली आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील ‘अब की बार उस पार’ म्हणत अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जावं असं म्हटलं आहे. गिरीराज सिंग यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

गिरीराज सिंग यांनी केलेल्या ट्विटनंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तुम्हाला सीमेपलिकडे जाण्यासाठी कोणी थांबवलं आहे? असा सवाल काँग्रेस आणि राजदकडून करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते प्रेमचंद मिश्रा यांनीदेखील सिंग यांच्यावर टीका केली आहे. केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी गिरीराज सिंग अशी वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडे हिंमत असेल तर त्यांना आणि केंद्र सरकाला कोणी थांबवलं आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

तर दुसरीकडे राजदचे नेते विजय प्रकाश यादव यांनीदेखील सिंग यांच्यावर टीका केली. गिरीराज सिंग हे केवळ पाकव्याप्त काश्मीरबद्दल का बोलतात आणि चीन बद्दल शांत का राहतात, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. तसेच कायम प्रकाशझोतात राहण्यासाठी ते असं करत असतात, असे यादव म्हणाले. यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील आता पाकिस्तानसोबत चर्चा ही केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, असं म्हटलं होतं.