News Flash

हे काय? मोफत उपचार मिळणार म्हणून भाजपा खासदाराने राजीनामा घेतला मागे

मनसुख वसावा यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला होता

गुजरातमधील भरुचचे भाजपा खासदार मनसुख वसावा यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आजारी असल्याचे कारण देत मनसुख वसावा यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेतल्यानंतर मनसुख वसावा यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४५ मिनिटं बैठक सुरू होती. त्यानंतर वसावा यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय मागे घेतला.

“खासदार राहिल्यास माझ्या पाठीच्या आणि मानेच्या दुखण्यावर नि:शुल्क उपचार करता येतील, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला सांगितले. मी खासदार म्हणून राजीनामा दिल्यास उपचार घेणं शक्य होणार नाही. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते माझ्या वतीने काम करतील अशी यंत्रणा तयार करण्यात येईल, असा विश्वास मला पक्षातील नेत्यांनी दिला आहे आणि विश्रांती घेण्यास सांगितले आहे,” असं वसावा यांनी गांधीनगर येथे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

“पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा देण्याच्या निर्णयामागचे एकमेव कारण म्हणजे माझी तब्येत. मी आज मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा केली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर मी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार म्हणून मी माझ्या लोकांची सेवा करत राहणार आहे,” असे वसावा यांनी सांगितले.

मनसुख वसावा हे गुजरात भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते ६ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ६३ वर्षीय मनसुख वसावाची यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. १९९४ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत जिंकून वसावा हे पहिल्यांदा आमदार झाले. गुजरातचे उपमुख्यमंत्री म्हणूनही वसावा यांनी काम केले आहे. त्यानंतर त्यांनी १९९८ मध्ये भरुचच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्यांनी मोठं यश मिळवलं. त्यानंतर सलग ते निवडणूक जिंकतच गेले. २०१४ मध्ये निवडणुक जिंकल्या नंतर त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपदही देण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 4:10 pm

Web Title: bjp mp withdraws resignation saying free medical services will not be available abn 97
Next Stories
1 झाडाची पानं तोडल्याने मारहाण झालेल्या दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
2 आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय
3 “तुम्ही माझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि आता अंत्यसंस्कारही करू देत नाहीत”
Just Now!
X