आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाशी भाजपाचा काहीही संबंध नाही. ते एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिलं आहे. त्यामुळे या पुस्तकाशी पक्षाचा काही संबंध नाही असं भाजपाचे राष्ट्रीय मीडिया को हेड डॉ. संजय मयुख यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपा महाराष्ट्र या ट्विटर हँडलवर संजय मयुख यांची प्रतिक्रिया ट्विट केली आहे.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या शीर्षकावरुन चांगलाच वाद देशभरात रंगला आहे. आता याबाबत भाजपाने सावध भूमिका घेत पक्षाचा या पुस्तकाशी संबंध नाही असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर जयभगवान गोयल यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील ते मी हेतूपुरस्सर केलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या पुस्तकावरुन एवढा वाद निर्माण होण्याची गरज नाही असंही मयुख यांनी म्हटलं आहे.

जयभगवान गोयल काय म्हणाले?

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकाचं प्रकाशन करत वाद ओढवून घेणारे जयभगवान गोयल यांनी पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करायचे त्याप्रमाणे नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असल्याचं सांगितलं. तसंच कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहेत.