‘राष्ट्र मंच’च्या बैठकीत शरद पवारांची महत्त्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली : देशातील ज्वलंत प्रश्नांवर तसेच, केंद्र सरकारच्या वादग्रस्त धोरणांविरोधात जनआंदोलन उभे करायचे असेल तर काँग्रेससह शिवसेना, द्रमुक अशा विविध राजकीय पक्षांना सामावून घ्यावे लागेल, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी झालेल्या ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीत केल्याची माहिती राजकीय-सामाजिक कार्यकर्ते व विश्लेषक आणि ‘राष्ट्र मंच’चे सदस्य सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली.

‘राष्ट्र मंच’ हे राजकीय व्यासपीठ नसले तरी, पवार हे मंचाचे मार्गदर्शक आहेत. ही बैठक पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी होणे ही देखील लक्षवेधी घटना म्हणावी लागते. त्यातून देशभर सकारात्मक संदेश दिला गेला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे राष्ट्रीय नेता आहेत, पण ते राजकारणात सक्रिय नाहीत. आता सर्वात ज्येष्ठ आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय नेते म्हणून शरद पवार यांच्याकडेच पाहिले जाते. पवार निव्वळ प्रादेशिक नव्हे, राष्ट्रीय नेते आहेत, विरोधी नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. पवारांनी राज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन केली हेही महत्त्वाचे आहे, असे या बैठकीला उपस्थित राहणारे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष व ‘राष्ट्र मंच’चे संस्थापक यशवंत सिन्हा यांनी बोलावलेल्या या बैठकीचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात राजकीय डावपेच आखण्याचा नव्हता वा तिसरी आघाडी बनवण्यासाठीही ही बैठक आयोजित केलेली नव्हती, तसे सिन्हा यांनी बैठकीत स्षष्ट केले. पण, ही बैठक फक्त बौद्धिक काथ्याकूट करण्यासाठी नव्हती हेही खरे. या चर्चांमधून भाजपविरोधात देशव्यापी आंदोलन कसे उभे केले जाऊ  शकते यावरही मतमतांतरे झाली, असे कुलकर्णी म्हणाले. या बैठकीला आठ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित असले तरी, काँग्रेस वा शिवसेनेचे नेते नव्हते. पवारांच्या सूचनेनुसार ‘राष्ट्र मंच’च्या पुढील बैठकांमध्ये या पक्षांना सामावून घेतले जाईल. देशातील प्रश्नांवर विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनआंदोलनाचा कार्यक्रम हाती घेतला तर त्यातून आगामी काळात विरोधकांची राजकीय एकजूटही होऊ  शकते, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

संसदेच्या बाहेर विरोधकांना एकत्र आणण्यासाठी समन्वय साधण्याचे काम ‘राष्ट्र मंच’ करत आहे. त्यातून आगामी काळात विरोधकांची एकजूट आणि दबाव गट निर्माण होऊ  शकेल, असा युक्तिवाद कुलकर्णी यांनी केला. ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांच्याशी दहा दिवसांपूर्वी चर्चा झाल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.