राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने लालकृष्ण अडवाणी यांचे महत्त्व भाजपसाठी संपलेले नाही हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुराणातील गोष्ट सांगत ऐकवले. अडवाणींच्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात भागवत यांनी अडवाणी नसतील तर यादवी माजेल, असे संदेश देत त्यांना दुय्यम स्थान देऊ पाहणाऱ्यांना स्पष्टसंदेश दिला आहे.
अडवाणींनी एका गावातील महिलेची गोष्ट आपल्या भाषणात ऐकवली. ही महिला गावात असेपर्यंत ती महिला आणि तिचा पती सोडून सगळे धनवान होते. मात्र एकाएकी ती महिला आपल्या पतीला गाव सोडण्यासाठी आग्रह धरते. मात्र पती त्याला नकार देतो, तेव्हा ती स्वत:ला ठार करण्याची धमकी देते. अखेर पती गाव सोडण्यास राजी होतो. मात्र ते जेव्हा गाव सोडतात, त्यावेळी गावात आगडोंब उसळतो, लोक सैरावैरा धावतात. त्यावेळी पती सांगतो आपण जोपर्यंत गावात होतो तोपर्यंत सगळे सुरक्षित होते. हाच धागा पकडत अडवाणींनी राजकारण सोडू नये. त्याच लोकांमध्ये राहावे. ते जर नसतील तर कठीण स्थिती होईल असे बजावत अडवाणींनी अजूनही भाजपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी असे सांगितले.
भाजपच्या जुन्या नेत्यांनी नव्या लोकांकडे धुरा द्यावी असा मतप्रवाह सुरू असतानाच अडवाणींना बाजूला सारू पाहणाऱ्या भाजपमधील नेत्यांना भागवत यांनी जोरदार झटका दिला आहे. भागवत यांच्या वक्तव्याला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली. जे जीवनात मिळाले त्यावर आनंदी रहा या अडवाणींच्या भाषणाचा उल्लेखही भागवत यांनी केला.