News Flash

केंद्राच्या ‘या’ निर्णयाबद्दल मला माहिती नव्हती; नितीन गडकरींची जाहीर कबुली

"हे रेकॉर्डवर ठेवणं मला महत्वाचं वाटतं"

संग्रहित (PTI)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. सरकारच्या एखाद्या निर्णयावर नाराजी असो किंवा सल्ला द्यायचा असो ते नेहमीच आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी लसीकरण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांना लसनिर्मितीसाठी परवाना देण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान यानंतर केंद्राने आधीच यासंबंधी निर्णय घेतला असून आपल्याला याची कल्पना नवह्ती अशी कबुली दिली आहे.

लसींच्या तुटवड्यावर नितीन गडकरींनी केंद्राला दिला सल्ला; म्हणाले…

नितीन गडकरी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “काल स्वदेशी जागरण मंचकडून आयोजित परिषदेत बोलताना मी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सल्ला दिला होता. माझ्या भाषणाआधीच केंद्रीय रसयान आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली होती याची मला कल्पना नव्हती,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

“परिषदेनंतर त्यांनी मला केंद्र सरकार १२ वेगवेगळ्या प्लांट/कंपनींकडून लसनिर्मितीसाठी मदत घेत असून या प्रयत्नांमधून भविष्यात निर्मिती वाढण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी मला कळवलं,” असंही नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

“मी सल्ला देण्याआधीच त्यांच्या मंत्रालयाने प्रयत्न सुरु केले असल्याची मला कल्पना नव्हती. योग्य दिशेने जात असल्याबद्दल मला आनंद असून त्यांचं अभिनंदन करतो. हे रेकॉर्डवर ठेवणं मला महत्वाचं वाटतं,” असंही नितीन गडकरी यांनी प्रांजळपणे मान्य केलं आहे.

गडकरींनी काय सल्ला दिला होता –
“लसनिर्मितीसाठी जास्तीत जास्त कंपन्यांना परवाना दिला पाहिजे. जर मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असेल तर समस्या निर्माण होते. एका कंपनीऐवजी १० आणखी कंपन्यांना लस तयार करण्यासाठी परवाना तसंच रॉयल्टी द्या,” असं नितीन गडकरी यांनी सुचवलं होतं. तसंच लसनिर्मिती वाढवण्यासाठी फॉर्म्युला देशभरातील इतर प्रयोगशाळांसोबत शेअर केला पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

“माझी खात्री आहे की, प्रत्येक राज्यात किमान एक ते दोन अशा प्रयोगशाळा असतील ज्यांच्याकडे क्षमता आणि पायाभूत सुविधा असतील. त्यांच्यासोबत फॉर्म्युला शेअर करा आणि लसनिर्मिती वाढवण्यासाठी समन्वय साधा. नंतर ते देशात पुरवठा करतील. निर्मिती जास्त असेल तर ते निर्यातही करु शकतील. हे १० ते १५ दिवसांत केलं जाऊ शकतं,” असं नितीन गडकरी म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 3:19 pm

Web Title: bjp nitin gadkari on vaccination advice says was unaware of central government decision sgy 87
Next Stories
1 Video : करोनाला पळवण्यासाठी भाजपा नेते यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर
2 “केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं मत देशाचं मत नाही”, परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावलं!
3 स्पुटनिक लसीचे दोन डोस व २४ दिवसांची रशियावारी फक्त सव्वा लाखात
Just Now!
X