दलितांच्या घरी भोजन

भाजपच्या नेत्यांनी सध्या दलितांच्या घरी जाऊन भोजन करण्यावर भर दिला असला तरी भाजपचा हा एकतर्फी व्यवहार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र रुचलेला नाही. हा एकतर्फी कार्यक्रम असल्याचे स्पष्ट करीत संघाने भाजपला सुनावले आहे. केवळ दलितांच्या घरी जाऊन भोजन करू नका, तर त्यांनाही तुमच्या घरी घरी आणून त्यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घ्या, असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे.

दिल्लीत संघाची अंतर्गत बैठक झाली, त्यामध्ये भागवत यांनी समरसता अभियानावर चर्चा केली. अष्टमीच्या दिवशी दलित समाजातील मुलींना घरी बोलावून आपण त्यांची पूजा करतो, पण आपण आपल्या मुलींना कधी दलितांच्या घरी पाठवतो का, असा सवाल भागवत यांनी केला. व्यवहार दोन्ही बाजूंनी झाल्यासच समरसता अभियान यशस्वी होईल, असेही भागवत म्हणाले.

केवळ दलितांच्या घरी जेवल्याने समरसता येणार नाही. त्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. दलितांच्या घरी गेल्याने धन्य झालो असे कोणाला वाटत असेल तर तो केवळ अहंकार आहे. कोणी स्वत:ला मोठा आणि दुसऱ्याला छोटा समजून त्याच्या घरी जेवत असेल तर त्याने समरसता कधीही येणार नाही, असे दिल्लीचे सहप्रांतचालक आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी सांगितले.

आऊटसोर्सिगहा दलितांचा अपमान : खा. सावित्रीबाई फुले

राजकीय नेते सध्या दलितांच्या घरी भोजनासाठी धाव घेत आहेत, मात्र अन्न, भांडीकुंडी आणि वेटर बाहरून आणत आहेत हा दुर्बल घटकातील जनतेचा अपमान आहे, असे भाजपच्या खासदार साध्वी सावित्रीबाई फुले यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना केली जात आहे तरीही आरोपींची कारागृहात रवानगी होत नाही केवळ प्रचाराने राजकीय उद्दिष्ट साध्य होणार नाही, असेही बहराइचच्या खासदार म्हणाल्या. दलितांच्या घरातील भोजनालाच का प्रसिद्धी देण्यात येत आहे, अन्य जातींच्या भोजनाला इतकी प्रसिद्धी का दिली जात नाही, असा सवालही त्यांनी केला. अन्न, भांडीकुंडी आणि वेटर यांचे आऊटसोर्सिग केले जात असून हा प्रकार अपमानास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या.