काँग्रेस पक्षावर टीका करताना अधिकाधिक आक्रमक व्हा, परंतु आपल्या सभ्यतेच्या मर्यादांचे पालन करा, असा आदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे प्रवक्ते आणि राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर होणारी चर्चासत्रे आणि पत्रकारांशी चर्चा करताना विरोधकांवर प्रतिहल्ला चढविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांसाठी गोपनीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी प्रवक्त्यांना विरोधकांवर हल्ला चढविताना काय करावे, आणि काय टाळावे, याबाबत सूचना केल्या.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन स्वराज यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेसवर टीका करताना पक्षाच्या नेत्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत, कारण एकदा शब्द उच्चारला गेला तर तो मागे घेता येत नाही, असेही स्वराज म्हणाल्या.  
सर्व प्रवक्त्यांनी आणि वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होणाऱ्या नेत्यांनी राजकीय विरोधकांचे आरोप खोडून काढताना एका स्वरूपाचेच मत मांडावे आणि सभ्यतेची मर्यादा ओलांडू नये, असेही स्वराज म्हणाल्या. भ्रष्टाचार, खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था, उत्तम प्रशासनाचा अभाव आदी प्रश्नांवर काँग्रेसवर हल्ला चढविण्याच्या सूचनाही या वेळी त्यांनी दिल्या.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने ज्या पद्धतीने हल्ला चढविला त्याला भाजपच्या प्रवक्त्यांनी ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले त्याबद्दल जेटली यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी मोदी यांच्याविरुद्ध अवमानकारक भाषा वापरली त्याला तितक्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर द्यावयास हवे होते, मात्र तसे करताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणार नाही याची काळजीही घ्यावयास हवी होती, असे जेटली म्हणाले.