दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मासिक पुण्यतिथीनिमित्त १६ सप्टेंबर रोजी देशभरात भारतीय जनता पार्टीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काव्यांजलीचा प्रमुख कार्यक्रम होणार आहे. दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषदेत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ही माहिती दिली.

शाह म्हणाले, १६ सप्टेंबर रोजी देशभरातील ४ हजार जागी हा काव्यांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी लिहीलेल्या कविता त्यांच्या आवाजातील रेकॉर्डिंग ऐकवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कवी संमेलनाद्वारे वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. यामध्ये विविध कवी अटलजींच्या कवितांचे म्हणतील तसेच त्यांनी अटलजींवर केलेल्या कवितांचे सादरीकरण होईल.

शाह यांनी सांगितले की, प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. प्रत्येक वेळी भाजपा कार्यकर्ते हा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा करतात. मात्र, यावेळी १७ ते २५ सप्टेंबर (दीन दयाल जयंती) पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. वाजपेयींसाठी ही कार्याजंली असणार आहे.

या सेवा सप्ताहादरम्यान, देशभरातील झोपडपट्ट्यांमध्ये भाजपा आणि सरकारकडून आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. यामध्ये लहान मुलांची तपासणी आणि लसीकरण, महिलांची तपासणी यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत या आरोग्य विम्याचाही यावेळी प्रसार करण्यात येणार आहे. देशभरातील २० हजारांपेक्षा अधिक जागांवर या सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.