News Flash

काश्मीरमध्ये पुन्हा पीडीपी-भाजप सरकार

सत्तास्थापनेसाठी आज राज्यपालांची भेट घेणार; उपमुख्यमंत्रीपद भाजपच्या निर्मल सिंग यांच्याकडेच

| March 26, 2016 02:17 am

जम्मूत शुक्रवारी भाजप आमदारांच्या बैठकीला सरचिटणीस राम माधव, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह, निर्मल सिंह उपस्थित होते.

सत्तास्थापनेसाठी आज राज्यपालांची भेट घेणार; उपमुख्यमंत्रीपद भाजपच्या निर्मल सिंग यांच्याकडेच
जम्मू- काश्मिरातील भाजप विधिमंडळ पक्षाने राज्यात पीडीपीसोबत सरकार स्थापन करण्याचा शुक्रवारी एकमताने निर्णय घेतला, तसेच पीडीपीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार मेहबूबा मुफ्ती यांनाही पाठिंबा जाहीर केला.
जम्मूमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून तेच नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे उमेदवार असतील.
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपीला पाठिंबा देण्याचा निर्णय भाजप विधिमंडळ पक्षाने घेतला असून, भाजप व पीडीपी हे शनिवारी एकत्रितरीत्या राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
आम्ही पीडीपीसोबत सरकार स्थापन करणार असल्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारालाही आमचा पाठिंबा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा म्हणाले. पीडीपीने मेहबूबा मुफ्ती यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या व पर्यायाने मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपची ही बैठक पार पडली.
राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेबाबतची भूमिका शुक्रवापर्यंत स्पष्ट करण्यास सांगितले होते. ती भेट भाजपने पुढे ढकलली आहे काय असे विचारले असता, पीडीपीसोबतच्या बैठकीनंतर आम्ही ते करणार असून सोबतच राज्यपालांची भेट घेऊ असे राम माधव यांनी स्पष्ट केले.
भाजप व पीडीपी या आघाडीच्या घटक पक्षांमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे या बैठकीला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्षांच्या आघाडीत काहीही बिघाड झाला नव्हता. सुमारे वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या प्रक्रियेचा हा पुढचा भाग असल्याचे मला वाटते, असे पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री असलेले सिंग म्हणाले.
आघाडीतील भागीदार लवकरच एकत्र बसून आपली सुसंगतता आणि समन्वयकता कायम राखून घडी कशी बसवायची याबाबतच्या औपचारिकता निश्चित करतील असेही सिंग यांनी सांगितले.

‘मेहबुबा भारत माता की जय घोषणा देतील काय?’
पीडीपीशी युती करून काश्मिरात सत्तास्थापनेसाठी सज्ज झालेल्या भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने केला आहे. मेहबूबा मुफ्ती ‘भारत माता की जय’ घोषणा देतील काय, असा सवाल आपचे मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी या घोषणेला विरोध दर्शवल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर मिश्रा यांनी भाजपला हा सवाल केला आहे. मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना ‘भारत माता की जय’ म्हणतील का, त्यांनी तसे न केल्यास भाजपची काय भूमिका असेल, असा सवाल मिश्रा यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. काश्मिरात पीडीपीशी युती करण्याची किंमत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चुकवावी लागेल, असेही मिश्रा यांनी पत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2016 2:17 am

Web Title: bjp pdp alliance in kashmir
टॅग : Bjp
Next Stories
1 सत्तेत आल्यास बांगलादेशासोबतची सीमा बंद करू!
2 उत्तराखंडच्या काँग्रेस बंडखोरांची याचिका फेटाळली
3 ब्रसेल्स हल्ल्यानंतर अडकून पडलेले २७० भारतीय सुखरूपपणे मायदेशी
Just Now!
X