भाजपकडून अतिरीक्त उमेदवार; राज्यात बिनविरोध निवड

राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि गुजरातपाठोपाठ राजस्थानमध्येही काँग्रेसला झटका देण्याची योजना भाजपने आखली आहे. राजस्थानमध्ये एक अतिरिक्त उमेदवार उभा करून भाजपने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण के ली. शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह सात जणांची राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजपर्यंत मुदत होती.

राजस्थानमध्ये तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने चुरस वाढली. मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येही काँग्रेसमध्ये खदखद असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक अतिरिक्त उमेदवार रिंगणात ठेवून चुरस वाढविली. संख्याबळानुसार काँग्रेसचे दोन तर भाजपचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.  राजस्थान काँग्रेसमध्ये असंतोष असून, त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न असल्याचा दावा भाजपकडून के ला जातो. मध्य प्रदेशपाठोपाठ राजस्थानमध्येही काँग्रेसचे काही आमदार फु टतील, असे सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसने राहुल गांधी यांचे निकटवर्तीय व मूळचे के रळमधील के . सी. वेणूगोपाळ यांना उमेदवारी दिली आहे. वेणूगोपाळ यांचा पराभव करण्याची भाजपची योजना आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसचा दुसरा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून भाजपने सारी ताकद पणाला लावली. काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामे दिल्याने दुसरा उमेदवार निवडून येणे कठीण मानले जाते. संख्याबळानुसार काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून येऊ शकत होते.  भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणण्याकरिता सारी ताकद पणाला लावली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले.

पवार, रामदास आठवले राज्यसभेवर

महाराष्ट्रात सात जागांसाठी आठ जणांचे अर्ज दाखल झाले होते, पण अपक्षाच्या अर्जावर सूचक व अनुमोदकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने हा अर्ज बाद झाला. शरद पवार व फौजिया खान (राष्ट्रवादी), उदयनराजे भोसले व डॉ. भागवत कराड (भाजप), रामदास आठवले (रिपब्लिकन), राजीव सातव (काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी (शिवसेना) यांची बिनविरोध निवड झाली. या संदर्भातील औपचारिक घोषणा आज करण्यात आली.