दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपाचे पोलिसचं जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे, असंही ढवळे यांनी म्हटलं आहे.

शेतकरी नेते अशोक ढवळे एबीपी माझावर बोलताना म्हणाले, “मी स्वतः आता दिल्लीमध्ये आहे. शहाजहांपूर सीमेवरुन जी ट्रॅक्टर परेड निघाली आहे, ती शांततेत सुरु आहे. बहुतेक ठिकाणी मोठ-मोठ्या परेड निघाल्या तिथे हिंसा झालेली नाही. आता जी हिंसा झाली त्याला पूर्णपणे भाजपा सरकारचे पोलीस जबाबदार आहेत, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे.”

आणखी वाचा- “हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही”; राहुल गांधींचं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन

कुणी तलवारी उपसल्या तर कुणी बसगाड्या फोडल्या… शेतकरी आंदोलनाचे मन सुन्न करणारे PHOTOS

“शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे. सरकारला शेतकरी आंदोलनाला पहिल्यापासून गालबोट लावायचं आहे. त्यांनी आंदोलनाची बदनामी केली, दमनशाही केली. हे करुनही सरकारची काहीही चाललं नाही. त्यानंतर त्यांनी हे एक शेवटचं अस्त्र बाहेर काढलेलं आहे. खरं म्हणजे दिल्लीमध्ये किंवा देशात कुठेही शांततापूर्ण निदर्शने करण्याचा घटनात्मकरित्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे,” असा आरोपही ढवळे यांनी केला आहे.