पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी प्रमाणपत्र भाजपने सार्वजनिक केल्यानंतर लगेचच आम आदमी पक्षाने ते बनावट असल्याचा गंभीर आरोप केला. पंतप्रधानांचे बनावट पदवी प्रमाणपत्र दिल्याबद्दल भाजपनेच माफी मागितली पाहिजे, अशी मागणी पक्षाचे नेते आशुतोष यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.


ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या पदवी परीक्षेच्या गुणपत्रिकेवर त्यांचे नाव नरेंद्रकुमार दामोदरदास मोदी असे लिहिण्यात आले आहे. तर पदवी प्रमाणपत्रावर ते नरेंद्र दामोदरदास मोदी लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या गुणपत्रिकेवरील परीक्षेचे वर्ष १९७७ आहे तर प्रमाणपत्रावर ते १९७८ असे लिहिण्यात आले आहे. हे कसे काय शक्य आहे, असा प्रश्न आशुतोष यांनी उपस्थित केला. जर एखाद्या स्नातकाला आपल्या नावामध्ये बदल करायचा असेल, तर तसे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. ते प्रतिज्ञापत्र कुठे आहे. ते सुद्धा सार्वजनिक करावे, अशी मागणी आपकडून करण्यात आली.


तत्पूर्वी, पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी, नरेंद्र मोदींनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेची पदवी तर गुजरात विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असल्याचे सांगितले. या दोन्ही प्रमाणपत्रांच्या प्रती पक्षाकडून सार्वजनिक करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. देशाच्या पंतप्रधानांच्या पदवीबद्दल शंका उपस्थित करून सार्वजनिक जीवनातील टीकेचा स्तर किती खालावला आहे, हे केजरीवाल यांनी दाखवून दिले असल्याची टीका त्यांनी केली. तसेच केजरीवालांनी देशाची माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली.