समाजवादी पक्षाच्या आणि बहुजन समाज पक्षाच्या अखेरच्या क्षणी एकत्र येण्याच्या रणनितीमुळे भाजपाला उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी मान्य केले आहे. भाजपाच्या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी एक समिती नियुक्त केली असून २०१९ मध्ये ५० टक्क्यांहून अधिक मतदान भाजपाला होईल, असे शहा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

शहा म्हणाले, शेवटच्या क्षणी सप आणि बसप एकत्र आल्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. पण २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत सप आणि बसपची ही खेळी यशस्वी होणार नाही.

भाजपाचा दोन जागांवर पराभव झाल्यानंतर काँग्रेसने संसद भवन परिसरात मिठाई वाटल्याचे सांगण्यात येते. पण हे कोणी सांगत नाही की, आम्ही त्यांच्याकडून ११ राज्ये घेतली आहेत. कोणी त्रिपुराबाबत बोलत नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे की, पोटनिवडणुका या स्थानिक मुद्यांवर लढल्या जातात. पण सार्वत्रिक निवडणुकीत ज्येष्ठ नेतृत्व आणि मोठे मुद्दे विचारात घेतले जातात, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

टीडीपीने एनडीएला दिलेली सोडचिठ्ठी आणि शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा घेतलेला निर्णय याबाबत शहा यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही २०१४ मध्ये ११ पक्षांसह निवडणूक लढवली होती. आता फक्त एकाने साथ सोडली आहे. यामुळे एनडीएला काहीच फरक पडत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीचे बॉम्बने उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत बोलताना म्हटले.