कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी प्रमुख पक्षांनी अनौपचारिकरित्या प्रचारास प्रारंभ केल्याचे दिसत आहे. जाहीर सभांमधून एकमेकावंर आरोपांची राळ उडवली जात आहे. आम्ही कोणत्याही उद्योगपतीचे कर्ज माफ केलेले नाही. याप्रकरणी राहुल गांधी धादांत खोटं बोलत असल्याचा आरोप अमित शहा यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत केंद्र सरकारने उद्योगपतींचे कर्ज माफ केले पण हिंदुस्तानच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला तर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले, असा आरोप केला होता.

तत्पूर्वी, सरकारने शेतकरी, मजूरांच्या खिशातून पैसा काढून देशातील १० उद्योगपतींचे खिसे भरले आहेत. आपल्या देशातील १० सर्वांत श्रीमंत उद्योगपतींचे कर्जे माफ करण्यात आले. तरीही कोणतेच उत्तर आम्हाला सरकारकडून मिळालेले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी कर्नाटकातील एका सभेत केली होती. याला उत्तर देताना शहा यांनी आम्ही कोणाचेही कर्ज माफ केले नसून राहुल गांधी खोटे बोलत असल्याचे म्हटले.

दरम्यान, सभेपूर्वी अमित शहांनी बिदरमधील आत्महत्या केलेल्या तीन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयाची भेट घेतली. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ९० दिवसांच्या त्यांची थकबाकी देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. यासाठी कायदा बनवल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, उमेदवाराला विसरुन जा, तुम्ही फक्त कमळाच्या चिन्हाकडे आणि मोदींच्या फोटोकडे लक्ष द्या. तुमचे काम हे केवळ विधानसभा मतदारसंघ निवडून आणणे हेच असणार नाही तर तुमच्या केंद्रावरही विजय मिळवणे असणार आहे. ज्यावेळी अशा प्रकारचे अनेक केंद्र तुम्ही जिंकून आणाल तेव्हाच आपण निवडणूक जिंकू, असा धडा शहा यांनी मागील आठवड्यात कार्यकर्त्यांना दिला होता.