भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली आहे. ज्या व्यक्तीकडे वंदे मातरमवेळी उभे राहण्यासाठी वेळ नाही, ते या देशाचे भले करू शकणार नाही, असा टोला शाह यांनी राहुल गांधी यांना लगावला. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा अपमान केल्याचा आरोप भाजपाने केला होता. राहुल यांना वंदे मातरमसाठी उभे राहण्यासाठी सांगण्यात येत असताना, राहुल यांनी मात्र घड्याळ दाखवत लवकर करा, असे म्हणताना व्हिडिओत दिसून आले होते. त्यावरून अमित शाह यांनी आज कर्नाटकातील नारगुंड येथील सभेत राहुल यांच्यावर निशाणा साधला.

एका ओळीत संपवा, राहुल गांधींकडून ‘वंदे मातरम’चा अपमान 

काँग्रेसच्या जनसभेत त्यांच्या अध्यक्षांनी मध्येच वंदे मातरम थांबवण्याचा चुकीचे काम केले आहे. जे वंदे मातरमच्या सन्मानार्थ उभे राहू शकत नाहीत आणि ज्यांच्याकडे यासाठी वेळ नाही. ते या देशाचे भले करू शकणार नाहीत, अशी टीका शाह यांनी केली. सिद्धरामय्यांच्या अंहकारामुळे कर्नाटकातील जनता महादायी योजनेतील पाण्यापासून वंचित असल्याची टीका ही त्यांनी केली.

दरम्यान, या व्हिडिओत कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के सी वेणुगोपाल राहुल गांधी यांना वंदे मातरमसाठी उभं राहण्यासाठी सांगत असताना, राहुल गांधी मात्र घड्याळ दाखवत लवकर करा असं सांगत आहेत. यानंतर वेणुगोपाल यांनी वंदे मातरम गाणाऱ्या व्यक्तीला एका ओळीत संपवून टाकायला सांगताना दिसत आहेत. काँग्रेसने मात्र भाजपावर टीका करत खोटा व्हिडीओ पसरवला जात असल्याचा दावा केला होता.