आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देशभराचा दौरा करत असून मित्रपक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी देखील सुरु आहेत. सध्या अमित शाह बिहार दौऱ्यावर असून त्यांनी गुरुवारी सकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. अमित शाहांनी नितीशकुमार यांच्या घरी चहा आणि नाश्ता केला. या ‘चाय पे चर्चे’त हे दोन्ही नेते राजकीय तिढ्यावर यशस्वी होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. बिहारमध्ये जनता दल संयुक्त आणि भाजपात जागावाटपावरुन मतभेद आहे. नितीशकुमार भाजपासोबत नाराज असल्याची चर्चा असून तिसऱ्या आघाडीने नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शाह गुरुवारी बिहारमध्ये पोहोचले. त्यांनी नितीशकुमार यांची भेट घेतली. नितीशकुमार यांच्या घरी अमित शाह यांनी चहापान केला. या भेटीदरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, भाजपा नेते भूपेंद्र यादव, नित्यानंद राय हे देखील उपस्थित होते. हे दोन्ही रात्रीचे भोजन देखील एकत्र करतील. यादरम्यान दोघांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा होईल, असे सूत्रांनी सांगितले.