काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आम्हाला चार वर्षांचा हिशेब मागतात. पंतप्रधानांना तुम्ही चार वर्षात काय केलेत असे विचारतात. मला राहुल गांधींना विचारायचे आहे की तुम्ही आणि तुमच्या गांधी घराणे चार पिढ्यांचा हिशोब देईल का? हा प्रश्न उपस्थित केला आहे तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. भाषणात ओरडून ओरडून ते नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतात. मात्र या देशाची जनता तुमच्याकडे चार पिढ्यांचा हिशोब मागते आहे त्याचे काय? असा प्रश्न विचारत आणि राहुल गांधी यांच्या भाषणाची नक्कल करत त्यांची खिल्लीही उडवली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथे सगळेच पक्ष एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. पण मुख्य लढत आहे ती काँग्रेस आणि भाजपामध्ये. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर बरसण्यात थोडीशीही कसर ठेवत नाहीत. बिदर येथे सोमवारी झालेल्या सभेत राहुल गांधी यांच्या भाषणाची खिल्ली उडवत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांना चार पिढ्यांचा हिशोब मागितला आहे.

आजच अमित शहा यांनी कलबुर्गी या ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवरही टीका केली. सिद्धरामय्या हे थ्रीडी राजकारणी आहेत. थ्रीडीचा अर्थ धोका, दादागिरी आणि घराणेशाही असा आहे. हेच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकारण केले असा आरोप शहा यांनी केला.

तसेच आम्ही व्यावसायिकांना मदत करतो असा आरोप आमच्यावर केला जातो मात्र त्यात काहीही तथ्य नाही. नीरव मोदी प्रकरणात आम्ही जेवढ्या तत्परतेने कारवाई सुरु केली तेवढी आत्तापर्यंत कोणीही केली नाही असाही दावा अमित शहा यांनी केला.