भाजप अध्यक्ष अमित शहा हे तीन दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. नियोजनानुसार, काल, गुरुवारी रात्रीच त्यांना भोपाळला पोहोचायचे होते. पण एका महत्त्वाच्या बैठकीमुले त्यांचे एअऱ इंडियाचे विमान चुकले. त्यानंतरही ते चार्टर्ड विमानाने जाणार होते. पण त्यातही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना भोपाळला जाता आले नाही. अखेर आज सकाळी शहा भोपाळला पोहोचले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत साडेतीनशेहून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप अध्यक्ष शहा हे देशभरात दौरे करत आहेत. तेथील भाजप नेत्यांच्या बैठका घेत आहेत. याचाच भाग म्हणून ते मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत. नियोजनानुसार, ते काल दिल्लीहून भोपाळसाठी रवाना होणार होते. पण एका महत्त्वाच्या बैठकीमुळे ते विमानतळावर वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे त्यांचे विमान चुकले. त्यानंतरही ते चार्टर्ड विमानाने भोपाळला जाणार होते. पण त्यातही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना जाता आले नाही, अशी माहिती भाजपच्या मध्य प्रदेशातील नेत्यांनी दिली. दरम्यान, आज सकाळी शहा यांचे भोपाळच्या राजा भोज विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय, प्रभात झा, प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान आणि अन्य नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. शहा आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पक्षाचे स्थानिक नेते, सुकाणू समितीचे सदस्य, राज्यातील पक्षाचे प्रवक्ते, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.