उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या रडारवर आता लोकसभेतील १२० जागा आहेत. या जागांवर भाजपचे अस्तित्व नाममात्र असून २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमित शहा या जागांवर पक्षबांधणी करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरप्रदेशमध्ये ४०३ पैकी ३१२ जागांवर घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोष सुरु आहे. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला तर नेत्यांनी या विजयासाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण मोदी आणि अमित शहा ही जोडी आता लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. निवडणुकीचे निकाल आल्यावर मोदी आणि अमित शहा यांनी दुरध्वनीवरुन चर्चा केली. उत्तरप्रदेशमधील निकालावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

पाच राज्यांमधील निवडणुकीनंतर आता अमित शहा यांनी लोकसभेतील १२० जागांवर लक्ष देण्याचे ठरवले आहे. दक्षिण भारतात तसेच पूर्वेकडील राज्यांवर अमित शहा लक्ष केंद्रीत करतील अशी माहिती पक्षातील सूत्रांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली आहे. केरळ, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमधील जागांचा यात समावेश आहे. या जागांवर भाजपचे अस्तित्व नाममात्रच असल्याने या जागा मोदींच्या छत्रछायेखाली आणण्याचा निर्धार अमित शहा यांनी केला आहे.

दरम्यान, शनिवारी निकालानंतर प्रतिक्रिया देताना अमित शहा यांनी विजयाचे श्रेय मोदींना दिले होते. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये मिळविलेले ऐतिहासिक यश ही काही साधीसुधी घटना नाही. तिचे परिणाम दूरगामी असतील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील गोरगरीब जनतेमध्ये निर्माण झालेल्या घट्ट आणि अतूट नात्यामुळे शक्य झाले असल्याची टिप्पणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केली. मोदी स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याची स्तुतिसुमनेही त्यांनी उधळली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp president amit shah next mission 120 lok sabha seats where bjp is hardly present
First published on: 12-03-2017 at 08:30 IST