भाजपने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून दि. १९ जानेवारी रोजी घोषित केले होते. पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याने पुढील राष्ट्रपती कोविंद हे असतील हे गृहीत धरले जात आहे. परंतु, पक्ष कोणताही धोका स्वीकारण्यास तयार नाही. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी गुजरातच्या तीन ज्योतिषांचा सल्लाही घेतला होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यांच्या सल्ल्यानंतरच कोविंद यांनी २३ जून रोजी सकाळी ११.५६ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अमित शहांची ही कृती एनडीएतील एका घटकपक्षालाही पसंत पडल्याचे बोलले जाते.

तेलुगु देसम पक्षालाही अशुभ राहू काळापासून दूर राहत रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरावा अशी इच्छा होती. यासाठी स्वत: पक्षाचे खासदार सी. रमेश यांनी अमित शहा आणि रामनाथ कोविंद यांना वस्त्रेही भेट दिली होती. तिरूपती बालाजींचा आशीर्वाद राहावा यासाठी ही वस्त्रे त्यांनी शहा आणि कोविंद यांच्या खांद्यावर ठेवली होती.

दि. २४ जुलै रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया या वर्षी २० जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणे आणि माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता १७ जुलै रोजी मतदान तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. पण काँग्रेसला त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची संधी सोडायची नाही. काँग्रेससहित १७ विरोधी पक्षांनी माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांना राष्ट्रपती पदाच्या उमेदवार जाहीर केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीवरून काँग्रेस आणि संयुक्त जनता दलातील अंतर वाढत आहे. भाजपने काँग्रेसपूर्वी कोविंद यांच्या नावाची घोषणा केली होती. त्याचवेळी जेडीयूने कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता. आपल्या निर्णयावर जेडीयू अजूनही ठाम आहे.