२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याच्या कल्पनेचे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी स्वागत केले आहे. हे सर्व पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या नरेंद्र मोदींचा पराभव करण्याची क्षमता नसल्याचा टोला लगावला. विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरही त्यांनी भाष्य केले. ३०० हून अधिक खासदारांचा पाठिंबा असलेल्या एनडीएचे सरकार लोकसभेत अविश्वास ठरावाचा सहज सामना करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

इतक्या उशिराने अविश्वास प्रस्ताव का आणला जात आहे?, या प्रस्तावाचा सामना करण्यास आमचे सरकार पूर्णपणे तयार आहे. सभागृहाच्या नियमांनुसार या मुद्यावर वाद झाला पाहिजे. काँग्रेस आणि दुसऱ्या विरोधी पक्षांना भविष्यातील त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळेच ते सभागृहातील कामकाजात अडथळा आणत आहेत.

नुकताच झालेल्या पोटनिवडणुकीतील विजयानंतर विरोधी पक्षांकडून महाआघाडी करण्याच्या शक्यतांबाबत बोलताना शहा म्हणाले की, एक वेळ होती, जेव्हा इंदिरा गांधींविरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येत. आता हे सर्व बदलले आहे. आता मोदींविरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. सध्या भारतातील ६७ टक्के भागात भाजपाचे सरकार आहे. वायएसआर काँग्रेस आणि तेलूगु देशम पक्षाद्वारे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून लोकसभेत अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. एकीकडे विरोधी पक्षांकडून सभागृहाचे कामकाज चालू दिले जात नाही. तर दुसरीकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीसही दिली जात असल्याचे ते म्हणाले.

ईशान्य भारतातील भाजपाच्या विजयाचे उदाहरण देताना शहा म्हणाले की, भारतात एनडीए वेगाने वाढत आहे. भारताच्या आतापर्यंतच्या सर्वांत यशस्वी पंतप्रधानांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय लोकांना घ्यायचा आहे.

भाजपाला सत्तेचा अहंकार निर्माण झाल्याचा आरोप निराधार असल्याचे शहा यांनी म्हटले. आमचा पक्ष कष्ट आणि मंद गतीने पुढे जाण्यावर विश्वास ठेवते. भाजपा कधी विभाजित झालेली नाही. उलट काँग्रेसचे नेत्यांनी प्रत्येक पराभवानंतर स्वत:चा एक पक्ष बनवलेला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.