पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखं सक्षम नेतृत्त्व नसतं तर १३० कोटी जनता असुरक्षित असती असं भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. करोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत सक्षमतेने हाताळली. लॉकडाउनचा निर्णय वेळेत घेतल्याने मोठी जीवितहानी टळली असंही ते म्हणाले आहेत. प्रदेश भाजपा कार्यसमिती बैठकीत जे पी नड्डा बोलत होते. व्हर्च्युअल माध्यमातून झालेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत टील, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश तसंच राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

“करोना महामारीमुळे निर्माण झालेली स्थिती मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत सक्षमतेने हाताळली. लॉकडाउनचा निर्णय वेळेत घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने अत्यंत प्रगत असलेले अमेरिका व युरोपातील देशांना लॉकडाउनचा निर्णय वेळेत घेता न आल्याने या देशातील बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अमेरिका, इंग्लंडसारखे देशही हतबल झाले आहेत. योग्य वेळी ते निर्णय घेऊ शकले नाहीत,” असं जे पी नड्डा यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- महाराष्ट्रात शत-प्रतिशत भाजपासाठी तयारीला लागा, केंद्रातून आदेश

“अडचणीच सापडलेल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी मोदी सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. या पॅकेजचा लाभ समाजातील अनेक वर्गांना झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्योग, कृषी यांसारख्या विविध क्षेत्रांना या पॅकेजचे फायदे पोहचवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजं. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती सामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहचवली पाहिजे,” असंही जे पी नड्डा यांनी म्हटलं.

आणखी वाचा- आता काहीही झालं तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाउन नाही, येडियुरप्पांचा निर्धार

दरम्यान भाजपाची स्वबळावर सत्ता सथापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध व्हावे, असं आवाहन जे पी नड्डा यांनी केलं. “करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यात राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. राज्य सरकारचे हे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेपुढे प्रभावीपणे मांडलं पाहिजे. यापुढील काळात कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय झालं पाहिजे. भविष्यात राज्यात स्वबळावर सत्तेत आणण्याचा निर्धार करून कार्यकर्त्यांनी काम करावे,” असं आवाहन नड्डा यांनी यावेळी केलं.