नवी दिल्ली : उत्तरेतील विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे भाजपपुढे विकास की हिंदुत्व असा पेच निर्माण झाला आहे. छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यात भाजपच्या निवडणूक प्रचाराचा भर विकासाच्या मुद्दय़ावर राहिला होता, मात्र अखेरच्या टप्प्यात विकासापेक्षा हिंदुत्वाची कास धरली गेली. पण, निकाल पाहता हिंदुत्वाच्या मुद्दय़ाने भाजपला साथ दिली नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर होण्याची शक्यता आहे.

भाजपची सत्ता असलेल्या तीनही राज्यांमध्ये विशेषत मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न कळीचा बनलेला होता. नोटाबंदीमुळे असंघटित क्षेत्रातील रोजगार कमी झाल्याने बेरोजगारीची समस्या सोडवणे हे शिवराजसिंह चौहान सरकारपुढील मोठे आव्हान बनले होते. शहरी भागांत रोजगारी आणि ग्रामीण भागात शेतीची दुरवस्था या दोन प्रमुख मुद्दय़ांचा फटका मध्य प्रदेशमध्ये बसला. आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला लोकांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार कोणती पावले उचलते याकडे मतदारांचे लक्ष असेल.

वरिष्ठांमध्ये नाराजी

पक्षात आणि सरकारमध्ये प्रत्येक निर्णय शहा-मोदी जोडी घेत असल्याने सत्तेचे केंद्रीकरण झाल्याची तक्रार उघडपणे होऊ लागली आहे. ‘एनडीए’तून बाहेर पडताना कुशवाहा यांनी केलेली टीका केंद्र सरकारच्या आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी आहे. शहा-मोदींविरोधात उघडपणे बोलले जात नसले तरी काही वरिष्ठ मंत्रीही नाराज असल्याचे सांगितले जाते. ही एककल्ली कार्यपद्धती बदलण्याची अपेक्षा पक्षांतर्गत स्तरावर केली जात आहे.